Sunday, January 29, 2017

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन






सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जिवाशिवाचे मिलन
या सुरेल शब्दांनी ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सांगीतिक गौरव केला जाणार आहे. साहित्यप्रेमी, रसिक आणि सुजाण वाचकांना साहित्यिकांशी जोडणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीकर कलाकारांचा सहभाग असलेले गीत तयार करण्यात आले असून साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये डोंबिवलीतील सर्व कलाकार एकत्र येऊन या गीताचे सादरीकरण करणार आहेत. संगीतकार सुखदा भावे दाबके यांनी या गाण्याला संगीत दिलं असून आनंद पेंढारकर यांनी या गीताचे लेखन केले आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ संगीतकार आणि गायक वसंत आजगावकर यांच्या हस्ते या सुरेल गीताचे अनावरण डोंबिवलीमध्ये करण्यात आले यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी,स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि आगरी युथ फोरमचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असणारे कलाकार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीकर कलाकारांनी सर्वांसमोर यावे या हेतूने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतची संकल्पना सुखदा भावे दाबके यांनी आयोजकांसमोर मांडल्यानंतर त्यांची मंजुरी तात्काळ मिळाली आणि या गाण्याची निर्मिती करण्यात आली . साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रम, संमेलनाची परंपरा याचा गौरव या गाण्याद्वारे करण्यात आलेला आहे.संमेलनामध्ये होणाऱ्या कवीकट्टा,चर्चा, परिसंवाद यांसारख्या उपक्रमांचा दाखला गाण्याद्वारे देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या बोलीभाषांचाही उल्लेख गाण्यामध्ये करण्यात आला आहे.
डोंबिवलीमधील जास्तीत जास्त कलाकारांना यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. शहरातील प्रतिष्ठित गायकांबरोबरच तरुण होतकरू गायकांनासुद्धा या गाण्यामध्ये संधी देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचासुद्धा या गाण्यामध्ये समावेश आहे. सर्व वयोगटातील रसिकांना हे गाणं आवडावं या हेतूने या गाण्याचे संगीत संयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे हे गौरवगीत असून संमेलन या व्यासपीठाचा गौरव करण्याच्या हेतूने या गाण्याची निर्मिती केल्याचे संगीतकार सुखदा भावे दाबके यांनी सांगितले. अमोघ दांडेकर आणि ऋषिराज साळवी यांनी या गाण्यासाठी वादन केले आहे. तर परीक्षित कुलकर्णी आणि आशिष गमरे यांनी गाण्याचे ध्वनीमुद्रण डोंबिवलीतील प्रभा डिजिटल स्टुडीओ येथे केले आहे.
या गाण्याचा छोटासा भाग होता आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगत वसंत आजगावकर यांनी गाण्यातील सर्व गायकांचे कौतुक केले आणि संमेलनाला शुभेच्छा दिल्या. तर स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी साहित्य संमेलनामध्ये सर्वांना घेऊन पुढे जाण्याची इच्छा असल्याचे सांगत कोणालाही बाजूला करण्याचा हेतू नसून सर्वांनी आपले घरचे कार्य समजून संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले. यावेळी या गाण्यातील गायक कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तर या गाण्यातील बालगायकांनी गाण्याच्या ओळी अनावरणानंतर रसिकांसमोर सादर केल्या.
मी आता डोंबिवलीकरच
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आता डोंबिवलीमध्ये येणे झाल्यामुळे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिकतेची प्रचीती मला झाली आहे. वारंवार डोंबिवलीमध्ये येणे होत असल्यामुळे मी आता आनंदाने डोंबिवलीकर झालो असल्याचे यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवारांचे पद्म पुरस्काराबद्दल अभिनंदन करत राजकारणापलीकडे जाऊन केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे सांगितले. पुढील दहा वर्षांसाठी हे संमेलन गीत ठेवता येऊ शकते इतकी चांगली निर्मिती केली असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले.
'आगरी युथ फोरम' निर्मित,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीत २०१७
गीत: आनंद पेंढारकर
संगीत: सुखदा भावे-दाबके
गायक: वसंत आजगावकर, निनाद आजगावकर, विनायक जोशी, हृषिकेश अभ्यंकर, केतन पटवर्धन,विवेक ताम्हनकर, रेश्मा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, ओंकार प्रभुघाटे, तन्वी गोरे, मानसी जोशी, श्रद्धा देवधर, क्षितिजा जोशी, रचना मुळ्ये
कोरस: आनंद पेंढारकर, श्रीनिवास आठल्ये, महेश देशपांडे, ओंकार भागवत, अभिलाषा वेदपाठक, शमिका केळकर, मृणाल केळकर, श्वेता रानडे
बालगायक: आशना राऊत, मृण्मयी भट, चैताली मसुरकर, कृतिका भिडे, निधी खांडेकर, तुषार सिरसे
तालवाद्य: ऋषिराज साळवी
गिटार: अमोघ दांडेकर
बासरी: अवधूत फडके, प्रणव हरिदास
ध्वनीमुद्रण व मिक्सिंग: परीक्षित कुलकर्णी, आशिष गमरे
संमेलन गीत
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
चरित्र, कादंबरी, कथा या साऱ्यांचा संदेश मराठी
नाट्य, चित्रपट, दूरचित्र येती लेऊनी वेश मराठी
ओव्या, अभंग, गोंधळ, भारुड, भक्तीची ती आस मराठी
लोकगीत, भावगीत, कविता अन गजलेचा श्वास मराठी
सह्याद्रीच्या छातीवरची रांगडी तरी गोड
परदेशातुन आंतर जालावर जपलेली ओढ
प्रबोधनाचे भान ठेवुनी रसिकमनाचे रंजन
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन
फलक, तोरणे, रांगोळ्यांनी मंद, सुशोभित विशाल प्रांगण
साहित्यातिल दीप्तीमान ताऱ्यांचे लखलखते हे तारांगण
भाषण, चर्चा, परीसंवाद, मुलाखतीही सादर
कविसंमेलन, मुशायरे अन काव्याचा जागर
व्यासपीठावर विद्वत्तेची मांदियाळी अन समोर दर्दी
ग्रंथखरेदी साठी साऱ्या दालनांमध्ये सुजाण गर्दी
प्रतिभेच्या तेजाला साऱ्या रसिकांचे हे वंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
आगरी ठाकरी संगमेश्वरी
धनगरी कोकणी मालवणी
वऱ्हाडी अहिराणी मावळी
डांगी दख्खिनी वडवाळी
मराठी×८
रंग वेगळे, ढंग वेगळे, एक तरीही स्पंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन
आनंद पेंढारकर
fb@https://www.facebook.com/anand.pendharkar.92
....….…....................
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन




मराठी साहित्य संमेलन Fb page  @ Marathi Sahitya Sammelan2017
website : http://www.90thsahityasammelan2017.com/
Twitter : https://twitter.com/90thSammelan 

0 comments: